Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
कर्नाटकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली असून याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळेसहित अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थातच कसमादे पट्ट्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने दणका दिला असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच 7 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने आज राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?
हवामान खात्यातील तज्ञानी सांगितल्याप्रमाणे, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातल्या फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झालीये पण त्याचा परिणाम आता शेवटच्या टप्प्यात आपल्या राज्यावर होताना दिसत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
कोकण : हवामान खात्याने आज कोकणातील दक्षिणेकडील रत्नागिरी, रायगड, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात आज पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील यासंबंधी जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा : मराठवाड्यातील दक्षिणेकडील धाराशिव व लातूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असे आयएमडीने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यांना सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.