Home Loan Interest Rate : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त व्याजदरात होम लोन, पर्सनल लोन असे कर्ज पुरवले जात आहे.
त्यामुळे कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेकांनी गृह कर्ज घेऊन घराची निर्मिती केली आहे. काहींनी वाहन कर्ज घेऊन आपल्या वाहनाचे स्वप्न पूर्ण केले आहे.
काही लोकांनी आपल्या वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतले आहे. मात्र अशा या कर्जदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या इंडियन बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकेने आज अर्थातच 3 फेब्रुवारी 2024 रोजी होम लोन, पर्सनल लोन सहित सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बँकेच्या माध्यमातून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स म्हणजे MCLR मध्ये वाढ केली आहे. याचा अर्थ असा की या बँकेतून होम लोन, पर्सनल लोन यांसारखे कर्ज घेणाऱ्यांचा मासिक हप्ता आता वाढणार आहे.
ज्या कर्जदारांचे कर्ज MCLR शी लिंक असेल त्यांचा EMI वाढणार आहे. इंडियन बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. ओव्हरनाइट MCLR आता 8.15 टक्के झाला आहे जो पूर्वी 8.10 टक्के होता.
1 महिन्याचा MCLR 8.30 टक्क्यांवरून 8.35 टक्के झाला. 3 महिन्यांसाठी MCLR 8.50 टक्के आणि 6 महिन्यांसाठी 8.70 टक्के झाला आहे. 1 वर्षाच्या MCLR बद्दल बोलायचे तर ते 8.80 टक्क्यांवरून 8.85 टक्के झाले आहे.
वाढलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. विशेष म्हणजे इंडियन बँकेच्या पूर्वी असाच निर्णय बँक ऑफ इंडियाने देखील घेतला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने देखील MCLR मध्ये वाढ केली आहे जी 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाली आहे. बँक ऑफ इंडियाने रात्रीचा MCLR 0.10 टक्के आणि 1 महिन्याचा MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे.
दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी MCLR वाढवले असल्याने आता भविष्यात इतरही बँका MCLR वाढवतील की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे.