स्पेशल

Home Insurance: लाखो रुपये खर्च करून घर बांधतात तर घराला दया विमा संरक्षण! मिळेल नुकसान भरपाई,वाचा माहिती

Home Insurance:- स्वतःचे घर असणे किंवा स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण घर किंवा जागेच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे यामध्ये आपल्याला काही लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते व त्यानंतर आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होत असते.

तसेच आता घर खरेदी करण्यासाठी अनेक बँका सहजरित्या होमलोन देखील देतात व त्यामुळे बरेचजण होमलोन घेऊन घर घेतात किंवा घर बांधतात. आपल्याला माहित आहे की, होम लोन घेतले म्हणजे खूप दीर्घ कालावधी पर्यंत आपल्याला त्याचे ईएमआय भरणे गरजेचे असते व त्याकरिता नेमके आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे असते.

अशाप्रकारे लाखो रुपये खर्चून आपण घर बांधत असतो. परंतु एखाद्या वेळेस जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा आग लागण्याची घटना घडली तर मात्र काय करावे? हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. घराच्या नैसर्गिक आपत्ती किंवा आधीच्या घटनेमुळे नुकसान झाले तर भरपाई मिळू शकते का हा देखील प्रश्न आपल्या मनात येतो.

त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असे देता येईल की ज्याप्रमाणे आपण वाहन किंवा इतर गोष्टींचा विमा काढतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही घराचा विमा काढून दुर्दैवाने अशा आपत्तींमध्ये जर घराचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळवू शकतात. त्यामुळे होम इन्शुरन्स काढणे खूप गरजेचे आहे व याच विम्याच्या मदतीने आपण आपले नुकसान भरून काढू शकतो.

 काय आहे होम इन्शुरन्सचे स्वरूप?

हा एक प्रकारचा मालमत्तेचा विमा असून यामध्ये विमाधारकाला नुकसान भरपाई दिली जाते. तुम्ही जर होम इन्शुरन्स घेतला तर घराला अपेक्षित किंवा अनपेक्षित नुकसानीपासून कव्हर मिळते. यामध्ये संपूर्ण घराची रचना तसेच घरात उपलब्ध वस्तू इत्यादींचा या कव्हरमध्ये समावेश केलेला असतो.

त्यामुळे तुम्हाला होम इन्शुरन्स म्हणजेच घराचा विमा घेऊन त्याचे नियमित हप्ते भरणे गरजेचे असते. नैसर्गिक आपत्ती पासून घराचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून होम इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप तसेच अतिवृष्टी किंवा पुरामुळे अनेक वेळा घरांची पडझड होते किंवा काही नुकसान होते. त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जर नुकसान झाले तर तुम्ही होम इन्शुरन्सच्या माध्यमातून भरपूर फायदा मिळू शकतो.

 घरात चोरी झाल्यास देखील मिळते संरक्षण

आपण कुठे बाहेर गेलेले असतो किंवा घरात असताना देखील घरात चोरीची घटना घडते व अशा चोरीच्या घटनांमध्ये अनेक मौल्यवान वस्तू चोरीला जातात. जर तुम्हाला अशा चोरी सारख्या घटनांपासून संरक्षण हवे असेल तर तुमच्यासाठी हा होम इन्शुरन्स हा फायद्याचा ठरतो. अशा अनेक पॉलिसी आहेत ज्या घरामध्ये चोरी झाल्यास तुम्हाला नुकसान भरपाई देतात.

 होम इन्शुरन्सचे आहेत हे महत्त्वाचे फायदे

होम इन्शुरन्सच्या माध्यमातून ज्याप्रमाणे घराला विमा संरक्षण प्राप्त होते त्यासोबतच आसपासच्या मालमत्तेला झालेल्या नुकसानाची भरपाई देखील या माध्यमातून आपल्याला मिळत असते.

यामध्ये मात्र जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घ्याल तेव्हा तुम्हाला याचा तपशील पूर्ण द्यावा लागतो. यामध्ये पॉलिसी निवडताना तुम्ही ॲड ऑन सारखा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला देते.

यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा देखील समावेश करू शकतात. तसेच होम इन्शुरन्स घेण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची लायबिलिटी कव्हर करणे हे होय. हे मालमत्तेचे नुकसान तसेच कामगार किंवा तृतीय पक्षाच्या आकस्मिक मृत्यूपासून  संरक्षण देखील प्रदान करते.

अशाप्रकारे जर तुम्ही होम इन्शुरन्स म्हणजेच घराचा विमा घेतला तर तुम्ही नुकसानीच्या कालावधीत देखील घर सुरक्षित ठेवू शकतात व नुकसान भरपाई मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts