सध्या बँक आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून विविध गोष्टींकरिता कर्ज सुविधा अतिशय जलद आणि कमीत कमी कागदपत्रांसह उपलब्ध झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी या कर्ज घेऊन पूर्ण केले जातात. याला कार किंवा बाईक खरेदी करणे देखील अपवाद नाही. कारच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या कार खरेदी करणे अगदी सोपे झालेले आहे
. तुमचा इन्कम चांगला असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर देखील उत्तम असेल तर तुम्हाला जवळपास 70 ते 80% पर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात बँकांच्या माध्यमातून दिली जाते. परंतु साहजिकच कर्ज घेतले म्हणजे आपल्याला त्याची परतफेड करावी लागते व त्या पद्धतीनेच कार लोन जर घेतले तर त्याचे महिन्याला आपल्याला हप्ते म्हणजेच इएमआय भरावा लागतो.
परंतु जर काही आर्थिक कारणांमुळे वेळेवर हप्ता भरणे शक्य झाले नाही तर मात्र बऱ्याच समस्या उद्भवतात. अशावेळी मात्र बँक किंवा फायनान्स कंपनीकडून रिकव्हरीची कारवाई करायला सुरुवात केली जाते व काही परिस्थितीमध्ये रिकव्हरी एजंट घरी येतात व कार उचलून नेण्याची शक्यता वाढते. अशावेळी आपण काय करावे? हे आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे असते.
कार लोनचा हप्ता भरला नाही तर बँक कशा पद्धतीने प्रक्रिया करते?
समजा तुम्ही कार लोन घेतले आणि तिचे हप्ते भरण्यामध्ये असमर्थ ठरला तर अशा पद्धतीमध्ये बँक पैसे वसूल करण्यासाठी काही मार्गांचा अवलंब करायला सुरुवात करतात. यामध्ये तुमचा एक हप्ता थकला किंवा बाउन्स झाला तर बँक अगोदर तुम्हाला आठवणीसाठी कॉल करते किंवा तुम्हाला दंड आकारून पैसे भरण्याचा एक पर्याय देते.
परंतु तरीदेखील तुम्ही सलग दुसऱ्यांदा हप्ता भरला नाही तर त्यांच्याकडून पुढचे पाऊल उचलले जाते व यामध्ये बँक तुम्हाला एक पत्र जारी करते किंवा बँकेचा प्रतिनिधी घरी येऊन तुमच्याशी संपर्क साधून यासंबंधी चर्चा करतात किंवा तुम्ही कर्ज प्रकरण करताना जर एखादा गॅरेंटर दिला असेल तर त्याच्यासोबत देखील संपर्क साधला जाऊ शकतो.
परंतु तरीदेखील तुम्ही तिसरा हप्ता थकवला व त्याची योग्य कारणे तुम्ही बँकेला देऊ शकला नाही किंवा सांगितले नाही तर बँक कठोर पावले उचलायला सुरुवात करते. यामध्ये सगळ्यात अगोदर बँक आमचे कर्ज खाते नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये काउंट करते व नंतर मात्र बँक कार रिकव्हरीची कारवाई सुरू करते.
अशावेळी बँकेचे रिकव्हर एजंट घरी येतात आणि कागदपत्रे कारवाई पूर्ण केल्यानंतर गाडी रिकव्हर करून सोबत नेऊ शकतात व त्यानंतर तुम्हाला एक महिन्याची वेळ देण्यात येते. यामध्ये तुम्हाला चार महिन्यांचा हप्ता, त्यावर लागलेली पॅनल्टी आणि गाडी ज्या ठिकाणी बँकेने पार केले असेल त्या वेअर हाऊसचा पार्किंग चार्ज द्यावा लागतो.
अशावेळी ग्राहकांचे काय अधिकार आहेत?
तुम्ही कर्जाची परतफेड केली नसेल तरीदेखील कोणताही बँकेचा रिकव्हर एजंट तुमच्याकडून जबरदस्तीने वाहन घेऊन जाऊ शकत नाही. असं झाले तर तुम्ही त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देखील करू शकतात.या प्रक्रियेमध्ये बँकेचा रिकव्हर एजंट तुमच्याशी वाईट वर्तन किंवा वाईट पद्धतीने वागू शकत नाही.
या व्यक्तीच्या नावावर कार लोन घेतले आहे किंवा करारनाम्यामध्ये गॅरेंटर आहे त्या व्यक्तीशिवाय बँक तुमची आर्थिक स्थितीची माहिती कुणाला देऊ शकत नाही. तुम्हाला काही कारणामुळे हप्ते भरणे शक्य होत असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधून तुमच्या आर्थिक स्थिती कशी आहे किंवा का झाली आहे याची माहिती देऊ शकता
व त्यांच्याकडून हप्ते भरण्यासाठी अधिकचा वेळ मागू शकता. यामध्ये लक्षात घेणे गरजेचे आहे की तुम्हाला वेळ द्यायचा की नाही हे त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. बँकेने जर तुम्हाला जास्तीचा वेळ दिला तर मात्र तुम्हाला जास्त व्याज आणि दंड भरणे गरजेचे असते.