अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 petrol price:- रशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्यानं युरोप आणि अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला देखील दुसरी मोठी बाजारपेठ शोधावी लागत आहे.
रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्यास अन्य काही देशांनी नकार दिला. त्यामुळे रशियाने हे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली.
आधीच इंधन दराचा भडका उडालेल्या भारताने ही ऑफर स्वीकारली आहे. रशियानेही याला प्रतिसाद देत सवलतीच्या दरात इंधन देण्याचे मान्य केले.
दररोज किमान ४५ लाख बॅरल तेल रशियातून सवलतीच्या दरात आयात केले जाणार आहे. यामुळे आपल्याकडील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रशियातून इंधन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडियन ऑइल’ने सोमवारी ‘व्हायोटेल’समवेत रशियाशी तीस लाख बॅरल कच्च्या तेलाच्या खरेदीचा करार केला.
हे तेल मे महिन्यात भारतात दाखल होईल. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाशी केंद्र सरकारने केलेला हा पहिला व्यवहार ठरला आहे.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असली, तरी अन्य देशांनी खरेदीला नकार दिल्याने रशियाला स्वस्तात तेलविक्री करण्याची वेळ आली आहे.
ही संधी मानून आता केंद्राने रशियाकडून स्वस्तात तेलखरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यावर आता अमेरिकेसह अन्य देशांच्या काय प्रतिक्रिया येतात, ते अद्याप स्पष्ट झाले नाही.