Karjat Jamkhed News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ. कारण असे की या ठिकाणी शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे दुसऱ्यांदा निवडणुकीचा रिंगणात होते. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांचे आव्हान होते.
गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 च्या निवडणुकीत राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असाच सामना झाला होता. त्यावेळी रोहित पवार यांनी अगदी सहजच कर्जत जामखेड ताब्यात घेतला. पण यावेळी कर्जत जामखेडची निवडणूक खूपच चूरशीची झाली.
मतमोजणीदरम्यान कधी रामा भाऊ पुढे तर कधी रोहित पवार पुढे अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. 21 व्या फेरीनंतर शिंदे हे 920 मतांनी आघाडीवर होते. पण रोहित पवार यांनी शेवटच्या फेरीअखेर 1243 मतांनी विजय आपल्याकडे खेचून आणला.
रोहित पवार यांना एकूण एक लाख 27 हजार 676 इतके मताधिक्य मिळाले अन राम शिंदे यांना एकूण एक लाख 26 हजार 433 इतके मते मिळालीत. यंदाची कर्जत जामखेड ची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी रामा भाऊंनी गेल्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्व तयारी केली होती.
भूमिपुत्र चळवळीच्या माध्यमातून राम शिंदे यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती केली. महायुतीचे नेते देखील राम शिंदे यांच्या मागे उभे होते. मात्र, 2019 प्रमाणे 2024 मध्ये देखील रामा भाऊंना पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान आपण रोहित पवार यांच्या विजयाची कारणे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1) कर्जत-जामखेडमधील स्थानिक नेत्यांनी रोहित पवारांची साथ सोडली म्हणून ते बॅकफुटवर होते पण असे असतानाही रोहित पवार यांनी जे सोबत आहेत त्या कार्यकर्त्यांसमवेत निवडणुकीचे यशस्वी नियोजन केले.
2) रोहित पवारांना महाविकास आघाडी कडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रचार केला.
3) यासह पवार यांनी मतदारसंघात केलेली विकासकामेही त्यांच्यासाठी फायद्याची ठरलीत. विद्यार्थ्यांना सायकल वाटप, आरोग्य शस्त्रक्रिया, फिरता दवाखाना इत्यादी कामे पवारांच्या विजयासाठी पूरक ठरलेत.