Ahmednagar News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. राज्यात ठिक-ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये वेगवेगळ्या मंडळाच्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
काल 31 ऑगस्ट 2024, शनिवारी नगर शहरात सुद्धा भव्य-दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चितळे रोड येथे लंके प्रतिष्ठान यांच्याकडून या दहीहंडीच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम खूपच मोठा होता आणि यामध्ये नगर शहरातील नागरिकांनी देखील हिरिरीने सहभाग घेतला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. खासदार निलेश लंके हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मात्र याच कार्यक्रमादरम्यान नगर दक्षिणचे खासदार अन पोलीस प्रशासनात शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली. खासदार निलेश लंके यांनी पोलिसांसोबत अरेरावी केली.
खरे तर, रात्री दहा वाजल्यानंतर पोलीस प्रशासनाने नियमांप्रमाणे चितळे रोड येथे सुरू असणाऱ्या दहीहंडी उत्सवातील डीजे सिस्टम बंद केली. पण, पोलिसांनी दहीहंडी उत्सवातील गाणं बंद केल्यामुळे खासदार निलेश लंके यांचा ताबा सुटला.
त्यांनी थेट स्टेजवरून पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. लंके यांनी माईक हातात घेत त्या ठिकाणी डीजे सिस्टम बंद करण्यासाठी आलेल्या PI अन DySP यांना अरेरावी केली. लंके आणि डीवायएसपी अमोल भारती यांच्यात वाद झाला.
या शाब्दिक चकमकीत लंके यांनी थेट डीवायएसपी अमोल भारती यांना अरेरावी केली. लंके यांनी ऐ PI गाणं लाव, ते मिक्सर लाव, तुला सांगितलेलं कळत नाही का ? अशा शब्दात PI यांच्याशी हुज्जत घातली.
तसेच त्यांनी ऐ DySP तुला सांगितलेल कळत नाही का, आम्ही आल्या-आल्या डीजे बंद केला, अर्धा तास वाजू दे ना, थोडी लाज वाटू दे ना, तुला प्रेमाची भाषा कळत नाही का ? अशा शब्दात माइकवरूनच पोलिसांसोबत वाद घातला.
सध्या याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून नेटकऱ्यांनी लंके यांना खडेबोल सुनावले आहेत.