Kopardi News : कोपर्डी अत्याचार प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. हे प्रकरण त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजले आणि या प्रकरणातूनच पुढे मराठा आरक्षणाचा वनवा पेटला. आठ वर्षांपूर्वी कोपर्डीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.
दरम्यान आज याचं पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली. खरंतर कोपर्डी येथे झालेल्या अत्याचारानंतर आंदोलनाची ठिणगी पडली.
पुढे त्यातूनच मराठा आरक्षणाचा लढा अधिक टोकदार झाला. आधी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चे काढले गेलेत अन याचं मराठा क्रांती मोर्चाचा सुधारित भाग म्हणून सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे.
मात्र, या मराठा आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांनाचं खलनायक ठरवण्यात आले आहे. दरम्यान आज ज्या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा वनवा खऱ्या अर्थाने पेटला त्याच कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीच्या लग्नाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि मराठा समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते. हा विवाह सोहळा नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाकळी हाजी या गावात आज ८ डिसेंबर 2024 रोजी दुपारी अगदीच साध्या पद्धतीने संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील सुद्रिक कुटुंबातील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह पारनेर तालुक्यातील मौजे निघोज येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला.
पण, वऱ्हाडींना सोयीचे ठिकाण असावे म्हणून हा विवाह सोहळा शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावात ठेवण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर, पोपटराव गावडे यांच्यासह भाजपचे नगर व पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी हजर होते.
यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुद्रिक आणि वराळ या दोन्ही कुटुंबांच्या विनंतीला मान देऊन नव वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थित साऱ्यांच्या वतीने आभार मानलेत.
तसेच त्यांनी आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर समवेत उपस्थित साऱ्या मान्यवरांचे आभार मानलेत. आलेल्या सर्व पाहुणेमंडळीचे सुद्रिक आणि वराळ कुटुंबाच्या वतीने माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वागत केले अन सर्वांचे आभार देखील मानलेत.