Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकी मधून धडा घेत विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक योजनांची घोषणा केली आहे. सामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुती सरकारने महिलांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा समावेश होतो. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परीत्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दिला जाणार आहे. याचा लाभ हा फक्त राज्यातील पात्र महिलांना मिळणार आहे.
तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला देखील यासाठी पात्र राहणार आहेत. या योजनेचे अर्ज एक जुलैपासून भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
यामुळे सध्या या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. अशातच आता या योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता रक्षाबंधनाच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला आहे. पण या योजनेचा पहिला हप्ता नेमका कोणत्या दिवशी पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार याबाबत राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचे आढळून आले आहे.
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 16 किंवा 17 ऑगस्टला मिळेल, अशी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या हप्त्याची वेगळीच तारीख सांगितली आहे.
लाडकी बहिण योजना खुप यशस्वी होईल. १९ तारखेला रक्षाबंधनांच्या दिवशी कमीत कमी २ कोटी महिलांच्या खात्यात ३-३ हजार प्रत्येकी जाणार, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिला वर्गात संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. नेमका या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा कधी होणार ? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे.
अखेर पैसे कधी जमा होणार ?
दरम्यान, काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 17 ऑगस्ट 2024 ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे या योजनेचा पैसा नेमका कधी जमा होणार याबाबत जी संभ्रमावस्था तयार झाली होती ती आता दूर होणार आहे. या योजनेचे पैसे आता 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 17 ऑगस्टला यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा सोहळा देखील आयोजित केला जाणार आहे.