Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाने जाहीर केलेली एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेची अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेरही या योजनेचे कौतुक केले जात आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून लाडकी बहिण योजना सुरू करण्याचा एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे.
महिलांना दरमहा पंधराशे रुपये
शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
दोन कोटी महिलांनी अर्ज केले
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी दीड कोटी महिलांचे अर्ज मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार
यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. म्हणजेच अर्ज करणाऱ्या महिलांची आणि मंजूर अर्जांची संख्या देखील वाढणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जे अर्ज मंजूर झाले आहेत त्या सर्व महिलांना 17 ऑगस्टला लाभ दिला जाणार आहे.
17 ऑगस्टला पैसे जमा केले जाणार
17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे शिंदे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. दरम्यान याच योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले नाहीत, त्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मंजूर केले जातील असे आश्वासन दिले आहे. तसेचं 17 ऑगस्ट नंतर मंजूर होणाऱ्या अर्जदार महिलांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये या योजनेचा लाभ दिला जाईल.
पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना जुलैपासून पैसे
विशेष म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या अन पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना जुलैपासून पैसे मिळणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.अर्थातच ज्या महिलांना 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे मिळतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज भरला असेल आणि 17 ऑगस्टला तुम्हाला पैसे आले नाहीत, तरी काळजी करण्याचे कारण राहणार नाही. कारण की तुम्हाला सप्टेंबर मध्ये म्हणजे पुढील टप्प्यात सुद्धा जुलैपासूनच पैसे मिळणार आहेत.