Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे, आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधी मधील पाच हप्त्यांचे पैसे वितरित करण्यात आले होते.
निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आमचे सरकार सत्तेत आल्यास लगेच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार अशी घोषणा देखील केली होती. मात्र महायुतीचे सरकार गेल्या महिन्यातच स्थापित झाले असून आता सत्ता स्थापित करून एका महिन्याचा काळ उलटला असतानाही लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत.
पण आज पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आमचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे सुद्धा आश्वासन दिले होते. यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 चा मिळणार की 2100 चा हा देखील प्रश्न होता.
दरम्यान राज्याचे नवोदीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर चा हप्ता हा पंधराशे रुपयांचाचं मिळणार असे संकेत दिलेले होते. हा हफ्ता 2100 रुपये करण्याबाबतचा निर्णय हा पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घेतला जाईल आणि अर्थसंकल्पानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतील असे सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे आजपासून डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही. डिसेंबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत. पण, पहिल्या टप्प्यात फक्त 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे.
त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहेत. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी सुद्धा वर्ग करण्यात आला आहे. एकंदरीत नवीन वर्ष सुरू होण्याआधीच डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींसाठी ही नववर्षाची एक मोठी भेट राहणार आहे.
कशी आहे लाडकी बहीण योजना?
गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत असून आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना मिळतोय. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाचं याचा लाभ दिला जातोय. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतोय. मात्र, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जातोय.