Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेचं जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक होती. मात्र काही महिलांना या मुदतीत अर्ज सादर करता आलेला नाही. यामुळे या योजनेसाठी ऑक्टोबर मध्येही अर्ज भरता येऊ शकतो का, आता अर्ज केला तर किती रुपये मिळणार असे काही प्रश्न महिलांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान आज आपण याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण लाडकी बहिण योजना आणि तिचे स्वरूप नेमके कसे आहे? आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना किती लाभ मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे स्वरूप कसे आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जात आहेत.
मात्र महाराष्ट्रात याच योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतोय. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरते हे विशेष. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
या योजनेसाठी एक जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि 30 सप्टेंबर 2024 अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक होती. मात्र, आता सप्टेंबर महिना संपला आहे, अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातही अर्ज सादर करता येऊ शकतो का अशी विचारणा केली जाऊ लागली आहे.
ऑक्टोबर मध्ये अर्ज सादर करता येणार का ?
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार होते. मात्र या मुदतीत अनेक पात्र महिला वंचित राहण्याची भीती होती. यामुळे याला मुदतवाढ देण्यात आली. नवीन निर्णयानुसार या योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता आलेत.
30 सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे अजून ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांना ऑक्टोबर मध्ये अर्ज भरता येणार का? हा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये अर्ज भरण्यास आणखी एका महिन्याची मुदत मिळू शकते असा दावा केला जात आहे.
म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येऊ शकतात असे म्हटले जात आहे. मात्र या संदर्भात अजून शासन दरबारी कोणतीच हालचाल पाहायला मिळत नाहीये. यामुळे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत मिळणार की नाही? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र या योजनेची साईट बंद आहे.
किती पैसे मिळणार
ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेत. अशा परिस्थितीत जर ऑक्टोबर महिन्यात सरकारने मुदतवाढ दिली. तर महिलांना आधीच्या महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत असे बोलले जात आहे.