Ladki Bahin Yojana : नुकताच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यावर्षी 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागले आहे.
दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना सरकारला दिलेल्या आहेत. यानुसार राज्यातील अनेक महत्त्वकांक्षी योजनांना तात्पुरता ब्रेक लागला आहे.
शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना देखील तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत ही योजना स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
खरे तर विधानसभा निवडणुकांसाठी लागू असणाऱ्या आचारसंहितांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र सध्या सोशल मीडियामध्ये लाडकी बहिण योजना बंद झाली असल्याच्या चर्चा आहेत.
त्यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र ही योजना बंद झालेली नाही. आता याचा पुढील लाभ केव्हा मिळणार याबाबतही मोठी अपडेट आली आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही योजना बंद पडणार अशा चर्चा सुरू असल्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली असून या अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.
तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. एवढेच नाही तर या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व भगिनींना पुढील हफ्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे.
म्हणून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती आहे, असे मंत्री तटकरे यांनी म्हटले आहे.