Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकांच्या आधी शिंदे सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात. महिलांना केंद्रस्थानी ठेवून शिंदे सरकारने अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना होय.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून झाली असून पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे 7500 रुपये देण्यात आले आहेत.
लाडकी बहिण योजना ही विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिला मतदार महायुती सरकारकडे आकर्षित झालेत आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी बनवले आहे.
सरकारने देखील या योजनेमुळेच महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले असल्याचे मान्य केले आहे. खरंतर, महायुती सरकारने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल अशी घोषणा केली आहे.
आपल्या जाहीरनाम्यात महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपयांची रक्कम आमचे सरकार पुन्हा एकदा आले तर 2100 रुपये करू अशी ग्वाही दिली आहे.
यामुळे आता महिलांच्या माध्यमातून लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ? असा प्रश्न उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की याची अंमलबजावणी ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे.
पुढील वर्षी जो अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये याबाबत तरतूद होईल आणि त्यानंतर मग या योजनेच्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहेत.
साधारणता एप्रिल 2025 पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल पासून या योजनेच्या पात्र महिलांना 2,100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
म्हणजेच डिसेंबर महिन्यात पात्र महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत. एप्रिल महिन्यात म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेच्या पात्र महिलांना 2,100 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.