Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत आर्थिक लाभ पुरवला जात आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत.
म्हणजेच या योजनेचा ज्या महिलांना जुलैपासून लाभ मिळत आहे त्यांना आत्तापर्यंत 7500 मिळाले आहेत. ऐन दिवाळीच्या काळात हा आर्थिक लाभ मिळाला असल्याने लाडक्या बहिणीची दिवाळी गोड झाली आहे. पण अशातच गत काही दिवसांपासून सरकार लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस म्हणून आणखी काही पैसे देणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याकाठी दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त आणखी 5,500 रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना मिळणार अशा बातम्या सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. काही महिलांना 3000 रुपये आणि काही निवडक महिलांना तसेच मुलींना 5500 रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळणार असे म्हटले जात होते.
यामुळे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हा दिवाळी बोनस आता कधी जमा होणार हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून मोठी माहिती हाती आली आहे.
तटकरे यांच्या कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, सरकार लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून अतिरिक्त पैसे देणार नाहीये. दिवाळी बोनसचे हे वृत्त साफ खोटे आहे आणि सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
एकंदरीत सरकार लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दिवाळी बोनस देणार अशा आशयाच्या ज्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या त्या साफ खोट्या आहेत. म्हणून महिलांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.