केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी ज्या काही योजनांची अंमलबजावणी केली जाते ती त्या त्या घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. अशा कित्येक योजनांच्या माध्यमातून सरकार हे अशा घटकांना वेगवेगळ्या कारणांसाठी आर्थिक मदत करते व या माध्यमातून अशा घटकांचा आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचवावे हा त्यामागचा उद्देश असतो.
अशाच प्रकारे महिलांसाठी देखील अनेक योजना केंद्र सरकार व त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन देखील राबवत आहे. महिलांसाठी असलेल्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर संपूर्ण देशांमध्ये चर्चा असलेली केंद्र सरकारची लखपती दीदी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे.
कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात येऊन या योजनेचा कार्यक्रम पार पाडला. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये नेमकी लखपती दिदी योजना काय आहे आणि त्यासाठी कोण अर्ज करू शकते व काय फायदा होतो? इत्यादी बद्दल माहिती जाणून घेऊ.
महिलांना मिळते बिनव्याजी कर्ज
लखपती दीदी योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून समाजातील आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते व ते देखील बिनव्याजी. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ज्या काही आर्थिक अडचणी असतात त्यापासून त्यांची मुक्तता होते व त्या स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक सक्षमतेच्या दिशेने वाटचाल करू शकतात. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील खेड्यापाड्यात तीन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
कोणत्या महिलांना करता येतो अर्ज?
महिलांच्या सबलीकरणासाठी ही विशेष योजना राबविण्यात येत असून वय वर्ष अठरा ते पन्नास या वयोगटातील महिला या योजनेकरिता अर्ज करू शकता.
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेच्या घरातील कोणताही सदस्य हा शासकीय नोकरदार नसावा. तसेच महिला व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी असावे व अशा कुटुंबातील महिला यासाठी अर्ज करू शकतात.
लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जासाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल व त्याचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना स्वयंसहायता बचत गट अर्थात सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एखाद्या व्यवसायासाठी योजना तयार करावी लागते व याप्रकारे व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवला जातो.
नंतर सरकारच्या माध्यमातून संबंधित अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केले जाते. त्यानंतर अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला त्याबाबत कळवण्यात येते व या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
या योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतात?
लखपती दीदी योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड तसेच उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक तसेच पासपोर्ट साईज फोटो व मोबाईल नंबर ही कागदपत्र असणे गरजेचे आहे.
प्रकारे या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ही योजना महत्त्वाची असून स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी महिलांना या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये ते पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. साधारणपणे देशातील तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा व लाभ घेण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.