Leopard Attack:- सध्या दररोज वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बिबट्याच्या हल्ल्याच्या बातम्या ऐकायला येतात. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बऱ्याचदा पाळीव पशु तसेच शेळीपालनामध्ये शेळ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
इतकेच नाही तर लहान मुले तसेच अनेक तरुण व्यक्ती देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडून आलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बिबट्याच्या हल्ला होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे कुटुंबे देखील उघड्यावर पडण्याच्या घटना घडल्या.
नेमकी बिबट्यांची संख्या का वाढली आहे किंवा बिबट्यांच्या हल्ल्या होण्यामागील कारणे काय आहेत याचा देखील शोध घेणे तितकेच गरजेचे आहे. कुठे ना कुठे माणूसच या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे असे दिसून येते.
बिबट्यांची मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या संख्येत का वाढ झाली?
माणसाने दिवसेंदिवस हव्यासापोटी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून जंगलांवर अतिक्रमण केले व यामुळे अनेक वन्यजीवांचा आज नैसर्गिक अधिवासच नष्ट झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागले व भक्षाच्या शोधात असताना मानवावर देखील हल्ला चढवू लागले आहेत.
बऱ्याचदा आपण उसाच्या फडामध्ये बिबट्याच्या मादीचे प्रजनन झालेले असते व अशा ठिकाणी बिबट्याची मादी पिल्लांना जन्म देते. म्हणजेच मानवी वस्तीमध्ये अशा पिल्लांची वाढ झालेली असते. त्यामुळे कालांतराने ही पिल्ले मोठे झाल्यानंतर त्याच परिसरात राहून आपला उदरनिर्वाह भागवत असतात. तसेच वन्य प्राणी अधिनियम सारखे काही कायदे असल्यामुळे देखील बिबट्या तसेच वाघ व सिंह यासारख्या प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आहेत.
माणसांवर हल्ला करण्याच्या घटनेत वाढ का झाली?
बिबट्या हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या प्राण्यांवर खास करून हल्ला करतो. त्यामुळे गोठ्यातील गाई किंवा म्हशी इत्यादी प्राण्यांवर बिबट्या जास्त प्रमाणात हल्ला करत नाही. परंतु त्या तुलनेमध्ये कुत्रे किंवा मेंढ्या तसेच शेळ्या यासारख्या उंचीने कमी असलेल्या प्राण्यांवर मात्र मोठ्या प्रमाणावर हल्ला करतो. तसे पाहायला गेले तर तो माणसांवर हल्ला करत नाही परंतु त्या तुलनेत लहान मुलांची उंची कमी असल्यामुळे लहान मुलांवर जास्त प्रमाणावर हल्ला करू शकतो असं देखील तज्ञ सांगतात.
बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचायचे तर ही काळजी घ्या
1- शेतात जर जायचे असेल तर हातामध्ये कोयता किंवा कुऱ्हाड तसेच काठी किंवा एखादे हत्यार ठेवणे कधीही चांगले आहे.
2- जर तुम्ही एखाद्या उंच वाढणाऱ्या पिकातून किंवा उसाच्या फडातून जात असाल तर मोठ्याने आवाज करत गाणे गात जाणे गरजेचे आहे. कारण मोठ्या आवाजाला बिबट्या घाबरतो व कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली तर तो पळून जातो.
3- तसेच शेतात जायचे असेल तर बॅटरी सोबतच ठेवावी. कारण बॅटरीच्या उजेडामुळे बिबट्या लांब जातो.
4- तसेच तुमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असेल आणि तुम्हाला शेतात काही काम असेल तर वाकून काम करणे टाळणे गरजेचे आहे. कारण तुम्ही वाकून काम करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता काही पटींनी वाढते.
5- तसेच तुमच्या शेतामध्ये जनावरे असतील किंवा पशुधन असेल तर त्या ठिकाणी बंदिस्त गोठा आणि प्रकाशाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण बिबट्या अंधारातच जास्त शिकार करतो. प्रकाशामध्ये बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता खूपच कमी असते.
6- बिबट्याची थोडीजरी चाहूल लागली तरी कुत्रे भुंकायला लागतात त्यामुळे तुम्हाला देखील अलर्ट मिळतो. त्यामुळे बिबट्या पासून संरक्षण करता येऊ शकते.
7- तसेच तुम्हाला बिबट्या दिसून आला किंवा बिबट्याचा वावर वाढलेला दिसल्यास तुम्ही तात्काळ वन विभागाला कळवणे गरजेचे आहे.