अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- टी-20 विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघाचे आव्हान उपांत्यफेरीपूर्वीच संपुष्टात आले.
भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असता आणि उपांत्य फेरी देखील जिंकली असती तर भारताचे दोन आणखी सामने झाले असते.
मात्र, भारतीय संघाचे आव्हान त्यापूर्वीच संपुष्टात आल्यामुळे ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान झाले.
सुपर-12 मध्येच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्याने ब्रॉडकास्ट स्टार इंडिया नेटवर्कला जवळपास 200 कोटींचे जाहिरातीच्या मिळकतीचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने यूएईमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत टेलिव्हिजन जाहिरातीच्या प्रसारणातून जवळपास 900 ते 1200 कोटींच्या कमाईचा अंदाज व्यक्त केला होता.
इंडस्ट्रीतील सुत्रांच्या माहितीनुसार स्टार नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी + हॉटस्टारने जवळपास 250 कोटींची कमाईचा अंदाज व्यक्त केला.
मात्र, एका अंदाजानुसार या स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडल्याने स्टार नेटवर्कला जवळपास 15 ते 20 टक्के नुकसान होणार आहे.
जर उपांत्य आणि अंतिम फेरीत भारतीय संघ दाखल झाला असता तर प्रेक्षकसंख्या देखील वाढली असती. सहसा ब्रॉडकास्टर्स क्रिकेट स्पर्धेसाठी 80 ते 85 टक्के जाहिरातीचे स्लॉट आधीच बुकिंग करुन ठेवतात.
तर उर्वरित बुकिंग स्पर्धेतील परिस्थितीनुसार केले जाते. जेणेकरुन स्पर्धेतील रोमांचक परिस्थितीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कमाई करता येते.
पण यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने स्टार नेटवर्कच्या हातचा जॅकपॉट हिरावला गेला आहे.