LPG Cylinder Price : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा धक्का बसणार आहे. येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. मात्र या सणासुदीच्या काळातच सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे दर चेंज केले जातात. घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजेच 14.2 किलो वजनी आणि 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याला बदलतात.
यानुसार ऑक्टोबर महिन्यातही गॅस सिलेंडरच्या किमती चेंज झाल्या आहेत. आज पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा थेट फटका बसणार नसला तरी अप्रत्यक्षरीत्या सर्वसामान्यांनाच याचा बोजा सहन करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती किती रुपयांनी वाढल्या आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
किती वाढल्यात गॅस सिलेंडरच्या किमती?
मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे.
इंडियन ऑइल ने जारी केलेल्या नवीन रेटनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1740, आर्थिक राजधानी मुंबई 1692.50, कोलकात्यात १८५०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १९०३ रुपये या दराने उपलब्ध होणार आहेत.
गेल्या महिन्यात अर्थात सप्टेंबर मध्ये देखील व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती 39 रुपयांपर्यंत वाढल्या होत्या. आता सलग दुसऱ्या महिन्यात या किमती वाढल्या असून यावेळी यामध्ये पन्नास रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती
दुसरीकडे 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून कायम आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या किमती कायम आहेत.
सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडर 903 रुपये, आर्थिक राजधानी मुंबईत 802.50, चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडर सप्टेंबरच्या ८१८.५० रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये या दराने उपलब्ध आहे. म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कोणत्याचं शहरात वाढलेल्या नाहीत.