Maharashtra Assembly Election : काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले असून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. राज्यातील अनेक दिग्गज नेते सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
मात्र महायुतीने या सहा महिन्यांच्या काळात जोरदार कमबॅक केला असून लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजनांमुळे पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीने या निवडणुकीत 233 जागा जिंकल्या असून महाविकास आघाडीला 51 जागा तर इतरांना चार जागा मिळाल्या आहेत.
महायुती मधील भारतीय जनता पक्ष 132, शिंदे गट 56, अजित पवार गट 41 जागांवर विजयी झालेत तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस 21, ठाकरे सेना 16 आणि शरद पवार गट 14 जागांवर विजयी झाला आहे. तब्बल 132 जागा घेऊन भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
भाजपाला राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात आत्तापर्यंतचे सर्वाधिक यश मिळाले आहे. या आधी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधीच एवढ्या जागांपर्यंत पोहोचला नव्हता. या निकालामुळे भाजपाला येत्या काही वर्षात भाजप स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापित करू शकतो असा विश्वास नक्कीच मिळाला असेल.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 148 उमेदवार उभे केले होते आणि यापैकी 132 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्यानंतर पण, या वादळात देखील भाजपाचे 15 उमेदवार पराभूत झाले आहेत. अहिल्या नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव झाला आहे.
ते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या विरोधात उभे होते. या ठिकाणी राम शिंदे यांच्या विजयाची शक्यता अधिक सांगितली जात होती. महत्वाचे म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत या दोन्ही उमेदवारांमध्ये मागे-पुढे सुरू होते. राम शिंदे यांनी काही राऊंड आघाडी घेतली तर रोहित पवार यांनी शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडी घेऊन येथून विजय मिळवला.
अकोला पश्चिम- विजय कमलकिशोर अग्रवाल
उमरेड- सुधीर पारवे
नागपूर उत्तर- मिलिंद माने
साकोली- अविनाश ब्राह्मणकर
आरमोरी- कृष्णा गजबे
ब्रह्मपुरी- कृष्णलाल बाजीराव सहारे
वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
यवतमाळ- मदन येरावार
डहाणू- विनोद मेढा
मालाड पश्चिम- रमेश सिंह
वर्सोवा- डॉ. भारती लव्हेकर
कर्जत जामखेड- राम शिंदे
लातूर- अर्चना पाटील चाकूरकर
माळशिरस- राम सातपुते
नागपूर (पश्चिम)- सुधाकर कोहळे