स्पेशल

लई भारी योजना सरकार ! पुढील पाच वर्षात राज्यात 3 हजार किलोमीटरचे 10 महामार्ग तयार होणार ; 36 जिल्ह्यात बनणार रस्ते

Maharashtra Breaking : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात भारतमाला परियोजनेअंतर्गत देशात अनेक ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची उभारणी केली जात आहे. या परियोजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील महामार्ग तयार केले जात आहेत.

दरम्यान आता महाराष्ट्र शासनाने देखील जिल्ह्या-जिल्ह्यातील अंतर कमी करण्यासाठी राज्यात 3 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. याच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्हे एकमेकांशी कनेक्ट करण्याची योजना वर्तमान एकनाथ शिंदे सरकारने आखली आहे.

नुकताच पहिला टप्पा पूर्ण केलेला 701 किमीचा भारतातील सर्वात लांब नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘समृद्धी महामार्ग’ व्यतिरिक्त राज्यात इतरही महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे.

राज्यात सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीचे 10 लहान-मोठे महामार्ग प्रकल्पाचे काम विविध टप्प्यांवर आले आहे. यामध्ये काही महामार्गाचे भूसंपादन सुरू आहे तर काही महामार्गाचे भूसंपादन चालू झाले आहे आणि काही महामार्गांचे प्रत्यक्षात काम देखील सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) हा विभाग स्वत:कडे ठेवलेला असून येत्या पाच वर्षांत रस्त्यांचे हे जाळे महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण होणार अशी आशा आहे.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पुढील पाच वर्षांत संपूर्ण महामार्गाचे जाळे पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि एकूण 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज वर्तवला आहे. निश्चितच समृद्धी महामार्गपाठोपाठ राज्यात तीन हजार किलोमीटर लांबीचे अन्य महामार्गांची निर्मिती होणार असल्याने महाराष्ट्राला निश्चितच समृद्धी लाभणार आहे.

राज्य सरकारने हाती घेतलेल्या या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्हा रस्त्याच्या जाळ्याने जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे येत्या पाच वर्षात एक वेगळा महाराष्ट्र घडवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एकदा रस्त्यांचे नेटवर्क तयार झाले की, अनंत संधी उपलब्ध होणार आहेत. या रस्त्यांच्या जाळ्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला कलाटणी मिळणार आहे.

शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा महामार्ग पण याच प्रकल्पाचा एक भाग 

एमएसआरडीसी हाती घेत असलेल्या या सर्व प्रकल्पांपैकी सर्वात लांब आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा नागपूर-गोवा महामार्ग आहे, ज्याला ‘शक्तीपीठ एक्सप्रेसवे’ म्हणून लोकप्रिय करण्याची योजना आहे. सुमारे 760 किमीचा, शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गापेक्षाही लांब असेल, म्हणजे हा महामार्ग आता भारतातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये, MSRDC ने प्रकल्पासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागार निवडण्यासाठी निविदा मागवल्या. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबरअखेरपर्यंत सल्लागाराची नियुक्ती करण्याची आशा आहे. शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग 11 जिल्ह्यांमधून जाणार असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील भाग एकमेकांना जोडले जाणार आहेत.

या होऊ घातलेल्या महामार्गामुळे महाराष्ट्र-गोवा सीमेवर असलेल्या वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जोडले जातील.

“नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे नागपूर ते वर्ध्यातील पवनारपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याच्यापुढे म्हणजे कोकणात प्रवास करू इच्छिणारे प्रवाशी शक्तीपीठ महामार्गच्या माध्यमातून कोकणात जाऊ शकणार आहेत.

नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गामध्ये नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत शक्तीपीठ एक्स्प्रेसवे बहुतेक विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील त्या भागांना कव्हर करेल ज्यांना नागपूर-मुंबई महामार्ग स्पर्श करत नाही.

या महामार्गांचे पण काम आहे सुरु 

नागपूर-गोवा एक्स्प्रेस वे व्यतिरिक्त, MSRDC विदर्भातील कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी जालना-नांदेड आणि जालना-नाशिक जे की नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गाला येऊन मिळतील या महामार्गांचे काम करत आहे. तसेच नागपूर-गोंदिया, गोंदिया-गडचिरोली आणि गडचिरोली-नागपूर महामार्ग यासारख्या प्रकल्पांवर देखील महामंडळाकडून जोरात काम सुरू आहे.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जालना-नांदेड आणि जालना-नाशिक महामार्ग प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याच्या अगदी जवळ आहेत. इतर प्रकल्पांसाठी, महामंडळाने ऑक्टोबर 2023 पर्यंत निविदापूर्व सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचप्रमाणे, एमएसआरडीसीला अपेक्षा आहे की, महत्त्वाकांक्षी मुंबई-गोवा कोकण

द्रुतगती महामार्गासाठी पूर्व निविदा उपक्रम देखील 2023 पर्यंत पूर्ण केल्या जातील. कोकण एक्स्प्रेस वे मुंबईला सिंधुदुर्गशी जोडेल आणि नागपूर-गोवा महामार्गाला पत्रादेवी येथे मिळेल.

कॉर्पोरेशन विरार, मुंबईचे सॅटेलाइट टाउन आणि अलिबाग आणि पुण्याभोवती रिंग रोड दरम्यान मल्टी-मॉडल कॉरिडॉरवर काम करत आहे, ज्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

मोपलवार म्हणाले, “आम्ही या प्रत्येक प्रकल्पासाठी सर्वोत्कृष्ट आर्थिक अंमलबजावणी मॉडेल सुचवण्यासाठी व्यवहार सल्लागार नेमणार आहोत. ते पुढे म्हणाले की केंद्र राबवत असलेले काही इतर महामार्ग प्रकल्प – सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे, औरंगाबाद-पुणे आणि पुणे-बेंगलोर महामार्ग – देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत.

महाराष्ट्रातील नवीन महामार्गांची यादी

नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे :- 701 किलोमीटर ( पहिल्या टप्पा सामान्य जनतेसाठी खुला)

नव्याने तयार होणारे महामार्ग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 100 km

मल्टी मॉडेल कॉरिडॉर 98.5km

पुणे रिंग रोड 136.5km 

पुणे-नासिक 180km 

मुंबई-गोवा 400 km

नागपूर-गोवा 800 km

जालना-नांदेड 180km 

जालना-नासिक 35 km 

नागपूर-गोंदिया 150 km 

गोंदिया-गडचिरोली 150km

गडचिरोली-नागपूर 150 km

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts