Maharashtra Bullet Train Project : भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे, देशात रेल्वेचे विविध प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये कार्यान्वित झाले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस चा प्रकल्प 2019 पासून सुरू असून या अंतर्गत देशातील अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. या ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच वेगवान झाला आहे. भारतातील अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वंदे भारत एक्सप्रेसच्या कनेक्टिव्हिटी ने समृद्ध झालेले आहेत.
दरम्यान आता देशात बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या गर्भात असून याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा प्रकल्प सध्या आकार घेतोय. लवकरचं मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्प सुरु होणार आहे.
कारण याचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प देशात प्रवासी वाहतूकीत क्रांती आणण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडवून आणण्याचे वचन देणारा हा प्रकल्प 1,08,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ फक्त दोन तासांवर येईल. यामुळे हा प्रकल्प गुजरात आणि महाराष्ट्राच्या विकासात गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, MAHSR प्रकल्प हा एक जटिल आणि तंत्रज्ञान-केंद्रित उपक्रम आहे, ज्याची एकूण लांबी 508 किलोमीटर एवढी आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली या राज्यांमधून हा प्रकल्प जात असून या मार्गावर 12 स्थानके नियोजित आहेत.
बुलेट ट्रेनचा प्रकल्प जपानी रेल्वेच्या पाठिंब्याने सुरक्षितता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे आणि तो भारतीय गरजा आणि हवामान परिस्थितीनुसार सानुकूलित करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणजे दक्षिण गुजरातमधील सूरत आणि बिलीमोरा दरम्यानचा टप्पा 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे उर्वरित काम देखील जलद गतीने पूर्ण करून हा संपूर्ण प्रकल्प सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.
हा प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल तेव्हा मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फारच वेगवान होणार आहे आणि यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेषता उद्योजकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.