Maharashtra Expressway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग येत्या काही दिवसांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
सध्या समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. बाकी राहिलेला ७६ किलोमीटर लांबीचा भाग येत्या काही दिवसांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल अशी माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्ग विकसित करणारचं अशी भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकरीता आपण शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. यामुळे शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार शर्तीचे प्रयत्न करणार आहे. या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होत आहे.
त्यामुळे हा विरोध शांत करण्यात महायुतीला यश येते का आणि हा महामार्ग पूर्ण होतो का हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे. पण जर हा महामार्ग पूर्ण झाला तर कोल्हापूर ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान होणार आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाटचं लागणार नाही.
सध्या कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याय नाही. पण, जेव्हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण होईल तेव्हा कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही. यामुळे कोल्हापूर ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या 60 मिनिटात पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासासाठी प्रवाशांना चार तासांचा कालावधी लागतो.
2023 मध्ये झालीये घोषणा!
शक्तीपीठ महामार्गाची घोषणा 2023 मध्ये करण्यात आली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. हा 802 किमी लांबीचा महामार्ग राहणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार आहे.
हा प्रस्तावित सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. या महामार्गातील सर्वात महत्वाचा टप्पा हा आंबोली घाट सेक्शनचा राहील.
या अंतर्गत आंबोली घाटाच्या पश्चिम घाटाखाली 2 बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. हा बोगदा 21.9 किलोमीटर लांब असेल. हा देशातील सर्वात लांब बोगदा ठरु शकतो. हा बोगदा तयार झाल्यावर कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास फक्त 1 तासात होणार आहे.
शक्तीपीठ महामार्गात अडथळे असतील तर पर्याय शोधले जातील. विरोध असलेल्या भागात फ्लायओव्हर किंवा सध्या असलेल्या माहामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडता येईल का या अनुषंगाने बदल केले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नक्कीच हा महामार्ग पूर्ण झाला तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना फायदा होणार आहे.