Maharashtra Expressway News : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र अर्थातचं श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नांदुरी ते सप्तशृंगी गड हा घाट मार्ग काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या घाट सेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची भीती असते, म्हणून या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसविणे व बॅरिअर बसविणे हे काम प्रगतीपथावर आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेचे मंदिर हे एक अर्ध शक्तीपीठ आहे.
राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे हे अर्धशक्तीपीठ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यामुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
दरम्यान याच भाविकांच्या सुरक्षेसाठी या घाट मार्गावर सुरक्षेच्या उपायोजना केल्या जात असून याच उपाययोजनांच्या कामांसाठी काही दिवस हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
यामुळे जर तुम्हीही सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड येथे जाऊ इच्छित असाल तर दर्शनाला निघण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा.
रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तारीख २५/११/२०२४ ते ९/०१/२०२५ या कालावधीत हा घाट रस्ता बंद ठेवला जाणारा आहे.
25 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबरला, तसेच दोन, चार, पाच, नऊ, 11, 12, 16, 18, 19, 23 डिसेंबर आणि सहा, आठ, नऊ जानेवारी 2025 ला हा मार्ग बंद राहणार आहे. हा घाट रस्ता पूर्ण दिवसभर बंद राहणार नाही तर या सांगितलेल्या तारखांना सकाळी ६ ते दुपारी ११.३० या वेळेत वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
गडावर ज्या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या दिवशी हा घाट मार्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाविकांच्या गर्दीचे दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी पूर्ण दिवस हा रस्ता सुरू राहणार आहे.
एवढेच नाही तर नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी नववर्षाच्या कालावधी दरम्यान हा मार्ग सुरू राहील. 24 डिसेंबर ते 5 जानेवारी असे सलग बारा दिवस हा रस्ता सुरळीत चालू राहणार आहे.
नक्कीच नववर्षाच्या स्वागतासाठी आईसाहेब सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रशासनाचा या निर्णयाचा कोणताच फटका बसणार नाही. तसेच सुट्टीच्या दिवसांमध्ये आणि मंगळवारी, शुक्रवारी ज्यांना मातेच्या दर्शनासाठी जायचे असेल त्यांच्यासाठीही याचा कोणतीच अडचण राहणार नाहीये.