Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. दरम्यान, राज्यात 2024 च्या अखेरीस अनेक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू होणार आहेत. राजधानी मुंबईत सुद्धा अनेक महत्त्वकांक्षी पायाभूत सुविधा सुरू होणार आहेत. यामध्ये मेट्रो 3 भूमिगत मार्ग, नवी मुंबई विमानतळाचे पहिले टर्मिनल, नवीन वाशी खाडी पूल, SCLR विस्तार, संपूर्ण कोस्टल रोड, मेट्रो 3 चा फेज I, आणि समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट. हा राज्यातील सर्वात चर्चित असणारा सध्याचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प. या प्रकल्पाअंतर्गत नागपूर आणि मुंबई दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा सहा पदरी ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित केला जात आहे.
खरंतर आतापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा मार्ग देखील लवकरच सुरू होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा राज्याचे कॅबिनेट मंत्री दादाजी दगडू भुसे यांच्या हस्ते सुरू झाला. आता या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण कधी होणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकल्पाचा चौथा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर ते मुंबई चा प्रवास वेगवान होणार आहे.
हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमधून जातो. या महामार्ग प्रकल्पामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे विभाग एकमेकांना जोडले गेले आहेत. खरे तर हा महामार्ग सहा लेनचा आहे.
मात्र भविष्यात हा महामार्ग आठ पदरी बनवला जाऊ शकतो. आठ पदरी महामार्ग बनवता येईल एवढ्या जमिनीचे संपादन आधीच करून ठेवण्यात आले आहे. यामुळे भविष्यात हा महामार्ग आठ पदरी होण्याची दाट शक्यता आहे.