Maharashtra New District : महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्यंतरी याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव अजूनही फाईलबंद आहे. याप्रकरणी सरकारने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही.
अशातच मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राला लवकरच 37 वा जिल्हा मिळणार अशा चर्चा सध्या रंगत आहेत. मराठवाड्यातील लातूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा बनवला जाईल अशा चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतं आहेत.
विशेष म्हणजे याची घोषणा 26 जानेवारी 2025 ला होऊ शकते असा देखील दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. यामुळे खरंच फडणवीस सरकार लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा तयार करणार आहे का? याबाबत सरकार दरबारी काही हालचाली सुरू आहेत का? याच प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत.
उदगीर जिल्हा बनणार का?
उदगीर हा महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा राहील, 26 जानेवारीला याबाबतची घोषणा होईल अशा आशयाच्या पोस्ट आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहेत. पण या व्हायरल पोस्ट मागील नेमकी सत्यता काय आहे? हे आता आपण समजून घेणार आहोत.
सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लातूर जिल्ह्यातील लोहा, कंधार आणि मुखेड या तालुक्यांमधील काही गावे मिळून नवीन उदगीर जिल्हा बनणार असा दावा केला जात आहे. यामुळे सध्या लातूर जिल्ह्यात विविध तर्क वितर्क सुरू आहेत.
मात्र सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असणारा हा मेसेज साफ खोटा आहे. सरकार दरबारी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाहीये. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोशल मीडिया मध्ये केला जाणारा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
खरेतर जर नवीन जिल्हा तयार होत असेल तर प्रशासकीय स्तरावर हालचाली पाहायला मिळाल्या असत्या. पण प्रशासकीय स्तरावर सध्या अशा कोणत्याच हालचाली सुरु नाहीत. एखादा नवीन जिल्हा निर्मिती करायचा असेल तर त्यासाठी हरकती, सूचना मागवल्या जातात.
मात्र याबाबत कोणतीच हालचाल सुरू नसल्याने ही अफवा असल्याचे दिसून येत आहे. नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घ्यायचा असेल तर याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाला असता. नवीन जिल्हा तयार करण्याची प्रक्रिया फार मोठी आहे. मात्र अशी कोणतीच प्रक्रिया सध्या सुरू नाही. यामुळे सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असणारा मॅसेज साफ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.