Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांच्या काळात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या एका दशकात विशेषतां 2014 पासून दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मोदी सरकारने आपल्या पहिल्या दोन्ही टर्म मध्ये देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत बनवली आहे.
विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पुन्हा एकदा सरकारने देशाची इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी पहिले मोठे पाऊल टाकले आहे.
देशात एकूण आठ नवीन हाय स्पीड कॉरिडॉर तयार केले जाणार असून या प्रकल्पासाठी सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातीलही एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने नाशिक फाटा ते खेड अर्थातच राजगुरुनगर दरम्यानच्या उन्नत मार्ग प्रकल्पाला म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या रस्त्यामुळे पुणे आणि खेड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थात शुक्रवारी केंद्रातील सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून यासाठी तब्बल 8,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
हा प्रकल्प बांधा, वापरा अन हस्तांतरित करा या तत्त्वावर पूर्ण केला जाणार आहे. या अंतर्गत आठ पदरी उड्डाणपुलाच्या निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीकरिता भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या असून आगामी काळात प्रत्यक्षात याचे काम सुरू होणार आहे.
ऑक्टोबरपासून या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा मार्ग 30 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 8000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे नाशिक फाटा ते खेड या दरम्यानची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. शिवाय नाशिक ते पुणे हा प्रवास देखील आधीच्या तुलनेत अधिक जलद होण्याची आशा आहे. हा एक आठ पदरी रस्ता राहणार आहे.
सध्या हा मार्ग चार पदरी असून यामध्ये दोन लेन वाढवल्या जाणार आहेत. तसेच सर्विस लेन देखील तयार केल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील विकासाला आणखी वेग येणार आहे.