Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला 60,000 कोटी रुपयांच्या एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी मोठी घोषणा नुकतीच केली आहे.
गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला लाभ व्हावा यासाठी एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. पुणे ते बंगळूरू नव्हे तर आता आम्ही मुंबई-पुणे-बंगळूरू असा नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या नव्या महामार्गाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महामार्गाचा रूट मॅप नेमका कसा राहणार? याबाबतही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार हा नवीन महामार्ग?
गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, या नवीन महामार्गाचा रूट मॅप हा मुंबईच्या अटल ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर तिथून मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा राहणार आहे.
हा मार्ग पुणे, सातारा, सांगली, बेळगाव असा बेंगलोर पर्यंत जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की, या महामार्गाचा जेएनपीटी चौक ते शिवडी या भागाचा डीपीआर अर्थातच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण सुद्धा झाला आहे.
कधी सुरु होणार काम?
या नव्या प्रस्तावित महामार्गाचे जेएनपीटी चौक ते शिवडी या भागाचे काम महिनाभरात सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. या भागातील दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे.
मग नंतर उर्वरित पन्नास हजार कोटींची कामे पूर्ण केली जाणार आहेत. ही कामे पुढल्या सहा महिन्यात पूर्ण होणार अशी माहिती हाती आली आहे.
60,000 कोटी रुपयांच्या या महामार्गापैकी 307 किमी लांबीचा मार्ग आपल्या महाराष्ट्रात आणि उर्वरित 493 किलोमीटर लांबीचा मार्ग कर्नाटकात राहील. हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा आहे.
या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त दीड तासात पूर्ण होणार आहे. तिथून पुढे जर बंगळूरूला जायचे असेल तर प्रवाशांना जवळपास पाच तासांचा कालावधी लागणार आहे. सातारा, रायगड, पुणे आणि सांगली या जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.