Maharashtra New Expressway : देशाची आर्थिक राजधानी तथा महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 701 km लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरु आहे.
नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचा समृद्धी महामार्ग सध्या सुरू असून उर्वरित इगतपुरी ते आमने यादरम्यानच्या 76 किलोमीटर लांबीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सुरु होणार आहे.
दरम्यान याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपुर आणि गोवा यांना जोडणारां शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र या महामार्ग प्रकल्पाचा बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या महामार्गाला मोठा विरोध सुरू आहे. हा ८०५ किलोमीटर लांबीचा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. खरेतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी या महामार्गाचे संरेखन अंतिम करून याचा आराखडा तयार करण्यात आला होता.
याच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. पण या महामार्गासाठी होत असणारा विरोध लक्षात घेता सरकारने याचे भूसंपादन थांबवले.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी या महामार्गाच्या संरेखणात बदल केला जाणार अशी माहिती समोर आली होती. यामुळे पर्यावरण विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने परत मागितला असून आगामी काळात याचा नवीन प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठवला जाणार आहे.
अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने आता शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळला जाईल अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द न करता फक्त कोल्हापूर जिल्हा वगळण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. खरंतर अर्थातच 22 तारखेला मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
मुख्यमंत्री महोदय यांना विमानतळावर शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने शक्तिपीठ महामार्गाबद्दल जाब विचारला होता. यावेळी महामार्ग रद्द करण्याचा लेखी आदेश द्या अशी मागणी संबंधित शिष्टमंडळाने केली.
यावर मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील महामार्गाचे काम थांबवले आहे आणि जिल्ह्यातील महामार्ग अन्यत्र वळविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पण यावर शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग न वगळता थेट महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली जात आहे. यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.