Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही महामार्गांची कामे सुरूचं आहेत. तसेच भविष्यात आणखी काही महामार्गांची कामे सुरू होणार आहेत. अशातच महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा
महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे.
नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू असून इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा येत्या काही दिवसांनी प्रवाशांसाठी खुला होणार आहे. अशातच आता समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याची योजना राज्य रस्ते विकास महामंडळाने आखली आहे.
9 हजार कोटी रुपयांचा खर्च
या अंतर्गत इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जाणार आहे आणि यासाठी 9 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच, दिल्ली-मुंबई महामार्गावरुन उत्तरेकडून आलेल्या वाहनांना वाढवण बंदरात पोहोचण्यासाठी 33.4 किमीचा आणि 120 मीटर रुंदीचा चारोटी ते वाढवण बंदर असा ग्रीनफिल्ड महामार्ग उभारला जात आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगाला गती
म्हणजेच इगतपुरी ते वाढवण बंदर पर्यंत एक नवीन रस्ता प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे इगतपुरी ते वाढवण बंदर हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर असून या नवीन रस्त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगाला गती मिळणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात तयार होणाऱ्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. परिणामी या दोन्ही विभागाचा विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे. समृद्धी महामार्गाच्या या विस्तारीकरणामुळे कृषी अन उद्योग क्षेत्राला सर्वाधिक फायदा होणार आहे.