Maharashtra New Expressway : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी महामार्गांच्या जाळे विकसित केले जात आहे. आधुनिक रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमुळे रस्ते कनेक्टिव्हिटी खूपच मजबूत झाली आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षांच्या काळात रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाले आहे. अशातच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एका नवीन महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. या प्रकल्पामुळे राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यातील नागरिकांना जलद गतीने बेंगलोरला जाता येणे शक्य होणार आहे. मुंबई ते बेंगलोर दरम्यान नवीन महामार्ग प्रकल्प विकसित केला जाणार आहे.
हा महामार्ग प्रकल्प पुण्यातील रिंग रोड ला जोडला जाणार आहे. म्हणजेच या प्रकल्पाचा पुण्यालाही फायदा होणार आहे. स्वतः केंद्रीय रस्ते महामार्ग अन वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
पुणे बेंगलोर हायवेवर देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. या हायवेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. मात्र हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रातील सरकारने आता कंबर कसली आहे. ही वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी तब्बल 14 पदरी महामार्ग तयार केला जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे टेंडर देखील निघाले आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आता आपण हा प्रकल्प नेमका कसा राहील या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवीन महामार्ग प्रकल्प
मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि पुणे बेंगलोर हायवे वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक नवीन 14 पदरी महामार्ग तयार केला जाणार आहे. मुंबई आणि बेंगलोर या दोन शहरांना जोडण्यासाठी हा महामार्ग विकसित होईल.
अटल सेतूवरून उतरल्यानंतर तिथून थेट १४ लेनचा नवीन हायवे पुण्याच्या रिंगरोडला जोडला जाईल. पुढे हा मार्ग बेंगलोर पर्यंत जाणार आहे. या नवीन मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम पुढच्या सहा महिन्यात करायचं ठरवण्यात आलं आहे.
या प्रकल्पाचे टेंडर निघाले असून या महामार्ग प्रकल्पाच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हा रोड पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ५० टक्के वाहतूक यावरून जाईल.
अटल सेतूवरून तुम्ही नव्या पुणे एक्सप्रेसला लागले तर तिथून पुण्याच्या रिंगरोडला येणार आणि तिथून थेट बंगळुरूला जाणार. पुढे हाच रोड पुणे औरंगाबादला जोडणार, त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये अडकणार नाही असं गडकरींनी सांगितले आहे.