Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील जनतेला नव्या वर्षात काही नवीन महामार्ग प्रकल्पांची भेट मिळणार आहे. सध्या राज्यात अनेक रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे हा महामार्ग या नव्या वर्षात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणारा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. सध्या या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरु आहे.
या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला, यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला, यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये सुरू करण्यात आला.
आता मार्च 2025 मध्ये इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या या टप्प्याचे फिनिशिंगचे काम सुरू आहे. यामुळे मार्चपासून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास गतिमान होणार आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात होणार आहे.
फेब्रुवारीअखेरीस समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण होईल आणि मार्चच्या सुरुवातीला हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. एवढेच नाही तर मुंबई – पुणे प्रवास देखील नव्या वर्षात गतिमान होणार आहे.
यां नव्या वर्षात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण होईल आणि हा प्रकल्प वाहतुकीसाठी दाखल होईल. या प्रकल्पाचे काम हे जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. म्हणून मिसिंग लिंकही नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुली होणार आहे.
त्यामुळे नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास जलद होईल अशी आशा आहे. मिसिंग लिंकचे काम सध्या वेगात सुरू असून जून २०२५ पर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांनी कमी होणार आहे.
यासोबतच ठाणे खाडी पूल तीन चे बांधकाम देखील या वर्षात पूर्ण होणार आहे आणि हा प्रकल्प देखील प्रवाशांसाठी खुला होणार आहे. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्यात येत आहे.
१.८३७ किमी लांबीच्या या पुलाची दक्षिणेकडील बाजू (मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी बाजू) सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. आता मार्चमध्ये उत्तरेकडील (पुण्याहून मुंबईला येणाऱ्या) मार्गिकेचे लोकार्पण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.
याशिवाय या नव्या वर्षात विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती मार्गासह अन्य काही रस्ते प्रकल्पांची कामे सुद्धा हाती घेतली जाणार आहेत. यामुळे राज्यातील रस्ते विकासाच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. 2025 हे वर्ष रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे.