Maharashtra New Expressway : मुंबई ते नवी मुंबई यांना जोडणारा आणि मुंबई-पुणे प्रवास गतिमान करणारा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्रावरील पूल अर्थातच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास वेगवान झाला आहे.
परिणामी मुंबईहून पुण्याला जाणे देखील सोयीचे झाले आहे. अशातच, आता मुंबई सहित पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते पुणे प्रवास आणखी गतिमान व्हावा यासाठी एक नवीन आठ पदरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा महामार्ग सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जोडला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राला मुंबई सोबत एक नवीन कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या नवीन मार्गाचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा नवीन आठ पदरी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प नेमका कसा राहणार यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रस्ता ?
हा नवीन आठ पदरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित होणार आहे. या प्रकल्पामुळे अटल सेतूवरून थेट पुणे, सातारा आणि सोलापूरला जाण्यासाठी एक प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे. यामुळे राजधानी मुंबई ते पश्चिम महाराष्ट्र या दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. हा प्रस्तावित करण्यात आलेला महामार्ग प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सध्याच्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी जेवढा वेळ लागतोय त्यापेक्षा दीड तास लवकर प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाणार आहे. हा महामार्ग 130 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 17000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या महामार्ग प्रकल्पाची रूपरेषा आखण्याचे काम सुरू आहे. खरे तर मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
मात्र भविष्यात हा प्रकल्प देखील अपुरा पडणार असून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हा नवीन आठ पदरी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विकसित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.