Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी राज्यात अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्गांची कामे येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत.
सध्या स्थितीला राज्यात मुंबई ते नागपूर या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 625 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाला आहे.
उर्वरित 76 किलोमीटर मार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचे 3 टप्पे वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत.
जुलै 2024 पर्यंत इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा देखील वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. अशातच आता राज्यात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार असे वृत्त समोर आले आहे. पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर असा हा नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग राहणार आहे.
हा मार्ग 230 किलोमीटर लांबीचा राहील. दरम्यान याच महामार्गाचा सामंजस्य करार पूर्ण झाला आहे. केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग विभाग तसेच महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात हा सामंजस्य करार झाला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला आहे. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
नागपूर ते पुणे प्रवास होणार गतिमान
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रस्तावित करण्यात आलेला पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास जलद होणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान तयार होत असलेल्या नवीन महामार्गामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास चार तासात पूर्ण होईल आणि समृद्धी महामार्गाला हा नवीन महामार्ग जोडला जाणार असल्याने तेथून पुढे नागपूर पर्यंतचा प्रवास दोन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
याचाच अर्थ या नवीन महामार्गामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण होणार आहे. या नव्याने प्रस्तावित महामार्गामुळे छत्रपती संभाजी नगर ते अहमदनगर हा प्रवासही गतिमान होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग गोंदिया व गडचिरोली पर्यंत विस्तारित केला जाणार अशी माहिती दिली आहे.