Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. राज्यात काही ठिकाणी नवीन महामार्ग तयार होत आहे तर काही जुने महामार्ग दुरुस्त करून त्यांचा विस्तार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या दुरुस्तीकरणाचे आणि विस्तारीकरणाचे काम सुरु आहे.
खरंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. याला महामार्गाचा दर्जा आहे मात्र अनेक ठिकाणी हा मार्ग फारच अरुंद आहे. तसेच या महामार्गाची काही ठिकाणी फारच दुरावस्था झाली असून यावरून दररोज मोठ्या प्रमाणात हलके आणि जड अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
पावसाळ्यात या मार्गावरील माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडतात. यां भागात रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न पावसाळ्यात नेहमीच अनुभवायला मिळतो. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यात हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
हेच कारण आहे की, भविष्यात या महामार्गावरील ताण आणखी वाढणार आहे. यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असतानाही राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाच्या दुरुस्ती करण्याचे काम 2021 साली हाती घेतले. खरे तर ठाणे अर्थातच माजिवाडा ते वडपे या मार्गाचे काम सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार अशी आशा होती.
तशी डेरलाइनच देण्यात आली होती. पण काही कारणास्तव या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या प्रकल्पाचे 64 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या काही महिन्यांनी पूर्ण होईल. या प्रकल्पाचे काम मे 2025 पर्यंत पूर्ण केले जाऊ शकते.
म्हणजेच मे नंतर या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा आहे. जून २०२१ मध्ये या प्रकल्पाचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले होते. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांनी हे काम पूर्ण होणार आहे.
ठाणे (माजिवडा) ते वडपे असा २३.८०० किमीचा हा प्रकल्प आहे. यामध्ये साकेत पूल, खारेगाव पूल हे महत्त्वाचे खाडी पूल आहे. तर एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाचा सामावेश आहे. खारेगाव टोलनाका येथे टोलनाका उभा केला जाणार आहे.