Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील विकासाला नवीन दिशा देणारा 701 किमीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेचा अंतिम टप्पा आता पूर्ण झाला आहे, जो महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आता हा महामार्ग प्रकल्प पूर्ण क्षमतेने लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
खरे तर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधीपासून सुरू होणार हा प्रश्न गेल्या वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात चर्चेस आला. कारण की डिसेंबर 2024 अखेरपर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी दाखल होणार अशी शक्यता होती. मात्र नियोजित वेळेत या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही आणि म्हणून हा टप्पा अजून प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकलेला नाही.
पण आता पुढील महिन्यात हा टप्पा वाहतुकीसाठी दाखल होणार आहे. समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी खुला असून लवकरच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल अशी शक्यता आहे.
701 किलोमीटरचा, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते इगतपुरी दरम्यान आधीच कार्यरत आहे, जो 625 किलोमीटरचा आहे, आणि शेवटचा 76 किलोमीटरचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग मुंबईपर्यंत विस्तारित होणार आहे.
अंतिम टप्प्याचे अधिकृत उद्घाटन पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे. एकदा हा मार्ग पूर्णतः कार्यान्वित झाल्यावर, समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ अर्धा करेल म्हणजे १६ तासांचा प्रवास केवळ ८ तासांवर येईल.
राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात हा महामार्ग एक नवीन परिवर्तन घडवून आणणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील या महत्त्वपूर्ण उपक्रमाची रचना महाराष्ट्रातील आर्थिक वाढ आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त झालेले प्रख्यात स्थापत्य अभियंता डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्यासह तज्ञांसोबत जवळून काम करून प्रकल्पाला पुढे नेण्यात माजी उपमुख्यमंत्री अन वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. समृध्दी महामार्गच्या यशात मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये कौशल्य असलेल्या डॉ. गायकवाड यांचा मोठा वाटा आहे.
MSRDC मधील त्यांचा मुख्य अभियंता ते उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असा नेतृत्वाचा प्रवास हा प्रकल्प साकारण्यात महत्त्वाचा ठरला आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल आणि यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे.