Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान, याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. पण, राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
शक्ती पीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. पण या जमिनी बागायती असल्याने बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाली आहे.
विरोधकांकडून या महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गामुळे महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका सुद्धा बसलाय. दरम्यान आता याच शक्तिपीठ महामार्ग संदर्भात माहिती सरकारमधील मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.
आपण शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शक्तिपीठ कुठल्याही सबबीवर आणि कोणत्याही परिस्थितीत होऊच देणार नाही, मी शेतकऱ्यांसोबतच आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्यास आमदारकीचाही राजीनामा देऊ, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिली.
ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ संपर्क दौऱ्यावर असताना त्यांची गाडी एकोंडी ता. कागल येथील शेतकऱ्यांनी थांबवली. यावेळी मुश्रीफ यांनी गाडीतून उतरत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी “शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे” या घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थिती रद्द केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
कसा आहे मार्ग ?
गेल्या वर्षी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर आणि गोव्याला जोडला जाणार आहे. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे. हा मार्ग राज्यातील सर्वात लांबीचा सुपर एक्स्प्रेसवे आहे.
हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल. हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा आणि सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे, हा महामार्ग नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे.