Maharashtra New Expressway : शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधील नागरिकांसाठी अर्थातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे. याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.
राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे पुणे ते शिरूर दरम्यान नवीन मार्ग तयार केला जाणार आहे. हा रस्ता 53 किलोमीटर लांबीचा राहणार असून पुढे अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर मार्गे हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाचा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही राज्यात अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये पुणे ते शिरूर दरम्यानच्या मार्गाचा देखील समावेश होतो. हा मार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा मार्ग?
मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन मार्ग केसनंद गावातून सुरू होईल आणि पुढे शिरूर पर्यंत जाणार आहे. शिरूरच्या पुढे हा महामार्ग अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजी नगर पर्यंत जाणार आहे आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
पुणे ते शिरूर या मार्गासाठी 7515 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तसेच, हा रस्ता पुढे अहमदनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दोन्ही मार्गासाठी 9565 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
या दोन्ही रस्त्यांची एकूण लांबी 250 km एवढी राहणार आहे. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास वेगवान होणार असून पुण्याला समृद्धी महामार्गाची जोडणी मिळणार आहे. या महामार्ग प्रकल्पाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे.
खरे तर पुणे ते छत्रपती संभाजी नगर दरम्यानचा हा प्रकल्प आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता. मात्र मध्यंतरी हा प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमएसआएडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे.
या अलीकडेच स्थापित झालेल्या एम एस आय डी सी या संस्थेकडे हा प्रकल्प वर्ग झाला असल्याने आता याचे काम जलद गतीने पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे.
मराठवाड्याचा एकात्मिक विकास या प्रकल्पामुळे सुनिश्चित होणार आहे. मराठवाड्याचा अविकसित भाग यामुळे विकासाच्या मार्गावर येईल अन पुणेकरांसहित मराठवाड्यातील जनतेला याचा फायदा होईल अशी आशा आहे.