Maharashtra New Highway : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांमधील अंतर कमी झाले आहे. अशातच आता पुणे आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे ते मुंबई असा प्रवास आता वेगवान होणार आहे. पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे.
सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चार तासांचा कालावधी लागतोय. मात्र भविष्यात हे अंतर अवघ्या दीड तासांवर येणार आहे. कारण की आता या दोन्ही शहरा दरम्यान एक नवीन महामार्ग विकसित केला जाणार आहे.
पुणे ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी सर्वसाधारणपणे चार तास आणि ज्यावेळी महामार्गावर वाहनाची गर्दी असते त्यावेळी यापेक्षा अधिकचा वेळ लागतो. मात्र भविष्यात या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे.
केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते मुंबई दरम्यान एक नवीन हायवे तयार होणार असल्याची माहिती दिली आहे. गडकरी यांनी नवीन हायवे बाबत बोलताना असे म्हटले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आम्ही बांधला तेव्हा आमच्याकडं पैसे नव्हते.
त्यामुळं तो महामार्ग बीओटी तत्वावर अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधला गेला. पण आता या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे.
मध्यंतरी याच रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की त्याचदिवशी मी ठरवलं इथं नवीन रस्ता बांधायचा. या नवीन हायवेमुळे आता मुंबईला अटल सेतूवरुन उतरल्यानंतर तिथून पुण्याच्या रिंगरोड पर्यंत आणि तिथून थेट बंगळुरुपर्यंत जाता येणार आहे.
या प्रकल्पाची किंमत ही जवळपास ४५ हजार कोटी रुपये एवढी आहे. महत्त्वाची बाब अशी की या हायवेच्या पहिल्या पॅकेजचे काम एका महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकल्पाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाला की अटल सेतूवरून केवळ दीड तासात पुण्याला जाता येणे शक्य होणार आहे. जुन्या मुंबई-पुणे हायवेवर आधी मोठ्या प्रमाणात ताण येत होता. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तयार करण्यात आला.
मात्र काळाच्या ओघात या नवीन एक्सप्रेस वे वर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यामुळे आता नवीन हायवे तयार केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास जलद होणार आहे.