Maharashtra New Railway Station : महाराष्ट्रासह भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपचं अधिक आहे. हा प्रवास खिशाला परवडणारा आणि याचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेला विशेष प्राधान्य दाखवले जाते. मात्र असे असले तरी प्रवाशांना प्रवास करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. रायगड जिल्ह्यातही अशीच समस्या आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोकणातील या जिल्ह्यातील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी, समस्येचे निराकरण व्हावे यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीचं संपन्न झाली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य कार्यालयात खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यात नवीन रेल्वे स्टेशन विकसित करावीत अशा सूचना खासदार महोदयांनी दिल्यात. मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या मार्गावर तीन नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याच्या सूचना खासदार महोदयांनी दिल्यात.
महत्त्वाचे म्हणजे तटकरे यांनी आपण स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावू अशी मोठी ग्वाही देखील दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात 3 नवीन रेल्वे स्थानक आगामी काळात तयार होऊ शकतात आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
कुठे विकसित होणार रेल्वे स्टेशन?
पनवेल ते रोहा या मार्गावर खारपाडा, गडब, आमटेम येथे नवीन स्टेशन विकसित करण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. खरे तर खारपाडा रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव याआधीच दिलेला पाठवण्यात आला होता. परंतु, जिते स्टेशन आणि खारपाडापर्यंतचे अंतर कमी होत असल्याने तो प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला नाही. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला होता.
पण आता ही अडचण दूर होणार आहे. खारपाड़ा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे, अशा सूचना खासदार तटकरे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली आहे. त्यामुळे आता खारपाडा स्टेशनसह गडब, आमटेम या तीन स्टेशनांचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रवाशांच्या इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणार का?
खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पनवेल-वसई-पनवेल आणि पनवेल-डहाणू-पनवेल या दोन्ही मेमू ट्रेनचा विस्तार पेणपर्यंत करावा आणि कोंबडी काळात बंद करण्यात आलेला दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५ व १०१०६) या गाडीचा पेण स्थानकातील थांबा पुन्हा सुरू केला जावा अशी मागणी सुद्धा लावून धरण्यात आली.
तसेच, मांडवी एक्स्प्रेस (१०१०३ व १०१०४), नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५ व १६३४६), मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६१९ व १२६२०), कोकणकन्या एक्स्प्रेस (१०१११ व १०११२) या रेल्वे गाड्यांना सुद्धा पेन रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दिवा-रत्नागिरी-दिवा या गाडीला हमरापुर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांच्या या मागण्या आगामी काळात पूर्ण होणार का हे पाहणे तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.