Maharashtra News : गाय ही हिंदू सनातन धर्मात पूजनीय आहे. हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो अशी मानता आहे. हिंदू धर्माचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजेच दिवाळीचा सण देखील गायीच्या पूजनानेचं सुरू होतो. वसूबारस ज्याला खानदेशातील काही भागांमध्ये गायबारस म्हणूनही ओळखले जाते, या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते.
या दिवशी गाय पूजन केले जाते. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. दरम्यान हिंदू धर्मात पूजनीय असणाऱ्या गायीला आता महाराष्ट्रात राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज अर्थातच 30 सप्टेंबर 2024 रोजी शिंदे फडणवीस पवार सरकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत देशी गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजेच देशी गायीला राजमाता म्हणून घोषित करण्यात आले. खरे तर वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत देशी गाईचे स्थान खूपच मोलाचे राहिले आहे. गायीच्या दुधाचे उपयुक्तता मानवी आहारात अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आयुर्वेद चिकित्सा, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये शेण व मूत्र यांना महत्त्वाचे स्थान आहे.
हे लक्षात घेऊन आतापासून देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण देशी गाईला राजमाता घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य नाही. या आधी 2018 मध्ये उत्तराखंड राज्य सरकारने गाईला राजमाता किंवा राष्ट्रमाता म्हणून घोषित केले होते. दरम्यान उत्तराखंड सरकार नंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील गाईला राजमाता म्हणून घोषित केले आहे.
याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आता शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. विश्व हिंदू परिषदेने देखील शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेऊ असे व्हीएचपीचे क्षेत्र मंत्री विंद शेंडे यांनी म्हटले आहे. सरकारने या संदर्भात माहिती दिली आहे.
काय म्हणतंय सरकार ?
सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला आहे. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे.
देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत.
वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे.