Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपात कांद्याची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कांदा आता मार्केटमध्ये दाखल होत आहे. खरे तर सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पैशांची गरज आहे.
यामुळे शेतकरी बांधव काढणी झाल्याबरोबर नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील नवीन कांद्याची आवक होत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 330 गाड्यांची कांदा आवक झाली होती.
यावेळी जुन्या कांद्याला तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि नवीन कांद्याला 2000 ते 4000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. मात्र जो कांदा पावसाने भिजला होता त्या कांद्याला फक्त 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे धाराशिव अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. सोमवारी दाखल झालेल्या एकूण गाड्यांपैकी फक्त 125 गाड्या कांदा हा नवीन होता. उर्वरित सर्व गाड्यांमध्ये जुना कांदा भरलेला होता.
म्हणजेच नवीन कांद्याची आवक अजूनही फारच कमी आहे. मात्र आगामी काळात नवीन कांद्याची आवक वाढणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीनंतर अर्थातच दसऱ्यानंतर नवीन कांद्याचे आवक बाजारात वाढेल असा अंदाज जाणकार लोकांनी वर्तवला आहे.
दिवाळी सणाला शेतकऱ्यांना पैशांची गरज भासणार आहे आणि यामुळे कांद्याचे काढणी करून लगेचच कांदा विकला जाण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूरच्या बाजारात म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे.
दरम्यान सोमवारी ज्याप्रमाणे कांद्याची विक्रमी आवक झाली त्याचप्रमाणे मंगळवारी देखील कांद्याची आवक वाढलेली दिसली. पण, आवक वाढल्याने बाजारभावात घसरण होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे बाजार भाव हे साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र कांद्याची आवक वाढल्याबरोबर कांद्याचे दर हे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत.
खरंतर अजून नवीन कांद्याची फारशी आवक बाजारात होत नाही. येत्या काही दिवसांनी नवीन कांद्याची आवक वाढणार आहे. अशा परिस्थितीत जर नवीन कांद्याची आवक वाढली तर बाजार भाव आणखी घसरू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.