Maharashtra Railway News : केदारनाथ आणि बद्रीनाथ हे भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र. केदारनाथ येथील केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अन बद्रीनाथ हे हिंदू सनातन धर्मात पवित्र अशा चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे दोन्ही तीर्थक्षेत्र उत्तराखंड राज्यात येतात.
राजधानी मुंबई येथील भाविक देखील केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. दरम्यान जर तुम्हीही देवभूमी उत्तराखंड येथील या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने एक विशेष टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत राजधानी मुंबईवरून वंदे भारत गौरव ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील भाविकांची केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे.
जर तुम्हाला ऑक्टोबर मध्ये केदारनाथ अन बद्रीनाथला जायचे असेल तर तुम्हाला रेल्वेच्या या पॅकेजचा फायदा होणार आहे. या पॅकेज अंतर्गत मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा तब्बल दहा रात्र आणि 11 दिवसांची राहणार आहे.
या पॅकेज अंतर्गत भाविकांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या या पॅकेज अंतर्गत भाविकांना ऋषिकेश, रुदयप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
ही यात्रा 3 ऑक्टोबर 2024 ला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून सुरू होणार आहे. 3 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता सीएसएमटी येथून यात्रेला सुरुवात होईल आणि 13 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11 वाजता ही यात्रा संपणार आहे.
आता आपण या यात्रेच्या भाड्याबाबत माहिती पाहूया. मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेचे दोन पॅकेज राहणार आहेत. पहिल्या पॅकेजनुसार प्रति व्यक्तीला 59,730 तर दुसऱ्या पॅकेजनुसार प्रति व्यक्ती 56,325 रुपये मोजावे लागणार आहेत.
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या पॅकेज अंतर्गत केदारनाथ येथे जाण्यासाठी कन्फर्म हेलिकॉप्टर तिकीट मिळणार आहे. होम स्टे / गेस्ट हाऊस / बजेट हॉटेल्समध्ये वातानुकूलित /गैर-वातानुकूलित कक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
ऑन बोर्ड ट्रेन जेवण उपलब्ध करून दिले जाईल , स्थानिक टूर एस्कॉर्ट्स अन सर्व प्रवाशांसाठी प्रवास विमा हे या टूर पॅकेजेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. नक्कीच मुंबईमधील ज्या नागरिकांना पुढील महिन्यात केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनासाठी जायचे असेल त्यांच्यासाठी ही भारत गौरव ट्रेन मोठी फायद्याची ठरणार आहे.