Maharashtra Railway News : मध्य रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणाच्या आधीच सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबईहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
दिवाळी आणि छटपूजेला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापुर दरम्यान चालवली जाणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणारे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?
सेंट्रल रेल्वेने या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार ही गाडी एलटीटी मुंबई रेल्वे स्थानकावरून 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सोडली जाणार आहे.
या काळात ही गाडी मुंबई येथून दररोज साडेदहा वाजता रवाना होईल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचणार आहे. म्हणजेच या गाडीच्या एकूण 21 फेऱ्या होणार आहेत.
यामुळे मुंबईहून दानापुर ला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल अशी आशा आहे. तसेच दानापूर रेल्वे स्थानकावरून 23 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.
ही गाडी दानापूर येथून २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचणार आहे. या विशेष गाडीच्या सुद्धा 21 फेऱ्या होणार आहेत. यामुळे दानापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला दोन्ही दिशांनी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या तेरा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.