Maharashtra Railway News : प्रयागराज येथे बारा वर्षांनी महा कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर अगदीच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. अनेकजण महा कुंभमेळ्याला जाण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. ही गाडी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील नांदेड ते बिहार मधील पटनादरम्यान ही गाडी चालवली जाणार असून ही ट्रेन युपी मधील प्रयागराज मार्गे धावणार आहे.
यामुळे श्रीक्षेत्र प्रयागराज येथे होणाऱ्या महा कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी विशेष फायद्याची ठरणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड-पटना विशेष गाडी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता नांदेड येथून सुटेल आणि 15 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता पटना रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
त्याचप्रमाणे पटना-नांदेड विशेष गाडी 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पटना येथून सुटेल आणि 17 फेब्रुवारीला पहाटे 4.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल. ही गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. नांदेड ते पटना अशी एक फेरी आणि पटना ते नांदेड अशी एक फेरी म्हणजेच या विशेष ट्रेनच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.
राज्यातील कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
या गाडीला मराठवाड्यातील आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झालेला आहे. रेल्वेने म्हटल्याप्रमाणे ही गाडी या मार्गावरील जवळपास सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर थांबवण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे.
या मार्गावरील अधिकअधिक प्रवाशांना या गाडीचा फायदा व्हावा या हेतूने या मार्गावरील पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर या स्थानकांवर या विशेष गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे.