Maharashtra Railway News : नुकताच विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. दरम्यान येता काही दिवसांनी दिवाळीचा मोठा आनंददायी पर्व साजरा होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
अशातच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासन आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हडपसर ते लातूर दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे.
या गाडीचा हडपसर ते लातूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. मराठवाड्यातील जनतेला या गाडीमुळे जलद गतीने पुण्याला पोहोचता येईल. सोबतच ही गाडी सोलापूरकरांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे.
सोलापूर मधील नागरिक दररोज नोकरी शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यामध्ये येत असतात. मात्र सोलापूर ते पुणे असा प्रवास करण्यासाठी फारच कमी रेल्वे गाड्या आहेत. मात्र जर सोलापूरकर कुर्डूवाडीला एसटीने गेलेत तर तेथून लातूर-हडपसर (पुणे) दिवाळी विशेष एक्स्प्रेसने पुण्याला सहजतेने जाऊ शकतात.
तसेच सोलापूरकरांना या गाडीमुळे कुर्डूवाडी येथून लातूरला जाणे देखील सोयीचे होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण हडपसर ते लातूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या दिवाळी विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लातूर व हडपसरहुन 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवार, मंगळवार, बुधवार अन शुक्रवारी ही गाडी चालवली जाणार आहे.
या काळात लातूर-हडपसर दिवाळी विशेष गाडी लातूर येथून सकाळी 09.30 वाजता सोडली जाईल अन कुर्डूवाडीला दुपारी 12.30 येईल तर हडपसरला सायंकाळी 03.40 वाजता पोहोचणार आहे.
तसेच हडपसर-लातूर ही दिवाळी विशेष गाडी हडपसर येथून सायंकाळी 04.05 वाजता सोडली जाणार आहे अन कुर्डूवाडीला 6.30 वाजता येणार आहे तसेच लातूरला रात्री 9.20 वाजता पोहचणार आहे.
दिवाळी विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही दिवाळी विशेष गाडी या मार्गावरील हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर, दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.