Maharashtra Railway News : सध्या भारतात फेस्टिवल सिझन सुरू आहे. देशात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. येत्या काळात येणाऱ्या या सण-उत्सवात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी सण उत्सवाच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
यंदाही सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढणार आहे आणि याच गरजेच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे.
ही विशेष एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्रातून धावणार असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही ट्रेन खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा फायदा होईल यात शंकाच नाही. अशा परिस्थितीत, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, उधना-पुरी विशेष रेल्वे (रेल्वे क्रमांक ०८७४२) १७ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. ही ट्रेन उधना येथून रोज सायंकाळी ५ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री पाऊणे अकरा वाजता ही रेल्वे पुरी येथे पोहोचणार आहे.
तसेच पुरी ते उधना विशेष रेल्वे (रेल्वे क्रमांक ०८४७१) १६ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी पुरी रेल्वे स्थानकावरून या काळात सकाळी ६.३० वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता उधना रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं थांबा मिळणार?
या विशेष एक्सप्रेस ट्रेनला चालठाण, व्यारा, नंदूरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा रोड, संबलपूर सिटी, रायराखोल, अंगुल, तालचेर रोड, धेनकनाल, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.