Maharashtra Railway News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 सप्टेंबरला महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आधी महाराष्ट्रातून आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू होती.
आता या यादीत नवीन तीन मार्ग समाविष्ट झाले आहेत. म्हणजेच राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या ही 11 वर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत.
मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते बेंगलोर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या जी कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे तीच आगामी काळात मुंबईपर्यंत विस्तारित केले जाईल असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी दिले आहे.
एवढेच नाही तर कोल्हापूरहून सुरू झालेल्या या वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर देखील आगामी काळात कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर-मिरज दुहेरीकरणाचे काम करण्याबाबतही रेल्वे सकारात्मक असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिली आहे.
कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर वैभववाडी चे काम थांबले आहे ते काम तात्काळ सुरू व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासोबतच खासदार महोदय यांनी कोल्हापूर मुंबई वंदे भारत आणि कोल्हापूर बेंगलोर वंदे भारत सुरू करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे देखील सकारात्मक आहे. सध्या कोल्हापूर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत आगामी काळात मुंबईपर्यंत विस्तारित होणार आहे. तसेच, भविष्यात कोल्हापूर बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनही सुरू होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.