Maharashtra Rain Alert : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. फटाके, कपडे, सरांफा बाजार, मिठाई आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सने बाजारपेठांच्या सौंदर्यात भर घातली आहे.
दरम्यान, अशा या आनंददायी वातावरणात सर्वसामान्यांसहित शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढवली आहे. दिवाळीच्या काळात देशातील अनेक राज्यांत पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.
IMD ने 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान किनारपट्टी भागात पावसाचा इशारा दिला आहे. अर्थातच यंदा पावसातच दिवाळीचा सण साजरा करावा लागणार असे दिसते. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहणार आहे. या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील,
अगदीच तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होईल असा अंदाज आहे. पण देशातील काही राज्यांमध्ये दिवाळीच्या काळात चांगल्या मुसळधारा पाहायला मिळू शकतात. IMD नुसार, 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, किनारपट्टी लक्षद्वीप आणि दक्षिण कर्नाटकच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ओडिशामध्ये २९ ऑक्टोबर रोजी हलका पाऊस अपेक्षित आहे.
मंगळवारी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विजा आणि मेघगर्जनेसह अंशतः ढगाळ वातावरण राहील.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातही आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज आहे. राज्यात एक नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
29 ऑक्टोबर पासून ते एक नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज पासून 31 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र,
विदर्भ आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. एक नोव्हेंबरला मात्र पावसाचा जोर कमी होईल, एक नोव्हेंबरला फक्त विदर्भात पाऊस पडणार असा अंदाज आहे.