Maharashtra Rain : उद्यापासून पश्चिम राजस्थान व कच्छ येथून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेचं ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, मान्सून जाता-जाता महाराष्ट्राला भरपूर झोडपणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण की गेली काही दिवस सुट्टीवर असणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज पासून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काल उत्तर महाराष्ट्र विभागातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मागे जसा पाऊस झाला होता तसा पाऊस झाला नाही. पण, राज्यात कालपासून पाऊस सक्रिय झाला आहे.दरम्यान भारतीय हवामान खात्याने 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत आता आपण हवामान खात्याचा हा अंदाज अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
22 सप्टेंबर : भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा हे विदर्भातील चार जिल्हे वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
23 सप्टेंबर : उद्या मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित 18 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 सप्टेंबर : 24 तारखेला पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे. संपूर्ण खानदेश, संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.